Posts

सांज ये गोकुळी

Image
संध्याकाळ. संध्याकाळ अथवा सांजवेळेवर अनेक कवींनी कविता रचल्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा प्रेमकविता आहेत. काही विरहगीते आहेत. परंतु एखाद्या संध्याकाळी आकाशाला लाली चढू लागली, अवखळ वारा वाहू लागला की एक गीत नेहमीच ओठांवर येतं. आणि माझ्या मनाला त्या गीताच्या ओळी गुणगुणण्याचा मोह आवरत नाही. ते गीत म्हणजे कवी सुधीर मोघे यांनी रचलेलं - सांज ये गोकुळी.  विशेष असं की हे गाणं त्यांनी चालीच्या मुखड्यावर बांधलं आहे!  कवी सुधीर मोघे यांच्या प्रत्येक काव्यात एक 'सहज' लय असते. साध्या, सहज शब्दातली पण गर्भरेशमी अर्थाची अशी त्यांची कविता आहे. या कवितेतही आपल्याला ही सहजता आपल्याला भावून जाते.  सांजवेळ झाली की सारीकडे अंधारुन येते. या सावळ्या सांजेलाच कवी कृष्णाच्या सावलीची उपमा देतो. सांजवेळी गावाकडे परतणाऱ्या साऱ्या वाटा या सावळ्या रंगात बुडाल्या आहेत. हा सावळा रंग भयाचा नाही. हा तर कृष्णाच्या कांतीचा आश्वासक रंग आहे. गाई पायदळी धूळ उडवीत परतत आहेत आणि त्यांच्यासवे पाखरांचे थवे सुद्धा आपल्या घरट्यांकडे झेपावताना दिसत आहेत. दूरवर कोठेतरी नदीच्या पैलथडीला असलेल्या मंदिरातून घंटानाद होत आहे. असे

घरपरतीच्या वाटेवरती

Image
          अशा एका संध्याकाळी आपण परतू लागतो घरपरतीच्या वाटेवरती. या परतीच्या वाटेवर गत आठवणींची धूसर धूळ उडत असते. आपली नजर अंधुक होते. वर्तमानाच्या अगतिकतेचा क्षणभर विसर पडल्यासारखा होतो. आणि थकलेली पावलं अडू पाहतात. धुळीच्या लोटामधील भूतकाळातील त्या हव्याहव्याशा क्षणांच्या मृगजळाभोवती पुन्हापुन्हा घुटमळू पाहतात...           घरपरतीच्या या वाटेवर अनेक पडल्या-झडल्या खुणा आहेत. जीर्णशीर्ण झाल्या असल्या तरी मावळतीची किरणं त्यांवर पडल्यावर त्या खुणा पुन्हा झळझळून आपल्यासमोर येतात. आपणच अशा वेळी दिपून जातो पुन्हापुन्हा त्यांना निरखून. घरपरतीची ती वाट कोकणातल्या एखाद्या नदीच्या एका खोल खोल डोहासारखी होऊ भासते. हळूहळू आपल्याला अंधाऱ्या तळाशी नेणारी. आपल्यातलं सारं त्राण हिरावून नेणारी. या वाटेवरच्या धुळीत अनेक पाऊल ठसे मिसळले आहेत. आपल्या मनाप्रमाणे या पायवाटेने ते अजूनही जपले आहेत. फक्त आपल्यासाठी.           आता घरपरतीच्या दिशेने आपल्या पावलांच्या सोबतीने पडणारी पावले नाहीत... पण त्या पावलांचे ठसे मात्र ठळकपणे आपली सोबत करताहेत.           या परतीच्या वाटेवर धूळ उडेल, डोळे भर