Posts

Showing posts from April, 2020

सांज ये गोकुळी

Image
संध्याकाळ. संध्याकाळ अथवा सांजवेळेवर अनेक कवींनी कविता रचल्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा प्रेमकविता आहेत. काही विरहगीते आहेत. परंतु एखाद्या संध्याकाळी आकाशाला लाली चढू लागली, अवखळ वारा वाहू लागला की एक गीत नेहमीच ओठांवर येतं. आणि माझ्या मनाला त्या गीताच्या ओळी गुणगुणण्याचा मोह आवरत नाही. ते गीत म्हणजे कवी सुधीर मोघे यांनी रचलेलं - सांज ये गोकुळी.  विशेष असं की हे गाणं त्यांनी चालीच्या मुखड्यावर बांधलं आहे!  कवी सुधीर मोघे यांच्या प्रत्येक काव्यात एक 'सहज' लय असते. साध्या, सहज शब्दातली पण गर्भरेशमी अर्थाची अशी त्यांची कविता आहे. या कवितेतही आपल्याला ही सहजता आपल्याला भावून जाते.  सांजवेळ झाली की सारीकडे अंधारुन येते. या सावळ्या सांजेलाच कवी कृष्णाच्या सावलीची उपमा देतो. सांजवेळी गावाकडे परतणाऱ्या साऱ्या वाटा या सावळ्या रंगात बुडाल्या आहेत. हा सावळा रंग भयाचा नाही. हा तर कृष्णाच्या कांतीचा आश्वासक रंग आहे. गाई पायदळी धूळ उडवीत परतत आहेत आणि त्यांच्यासवे पाखरांचे थवे सुद्धा आपल्या घरट्यांकडे झेपावताना दिसत आहेत. दूरवर कोठेतरी नदीच्या पैलथडीला असलेल्या मंदिरातून घंटानाद होत आहे. असे