सांज ये गोकुळी

संध्याकाळ.

संध्याकाळ अथवा सांजवेळेवर अनेक कवींनी कविता रचल्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा प्रेमकविता आहेत. काही विरहगीते आहेत. परंतु एखाद्या संध्याकाळी आकाशाला लाली चढू लागली, अवखळ वारा वाहू लागला की एक गीत नेहमीच ओठांवर येतं. आणि माझ्या मनाला त्या गीताच्या ओळी गुणगुणण्याचा मोह आवरत नाही. ते गीत म्हणजे कवी सुधीर मोघे यांनी रचलेलं - सांज ये गोकुळी. 

विशेष असं की हे गाणं त्यांनी चालीच्या मुखड्यावर बांधलं आहे! 

कवी सुधीर मोघे यांच्या प्रत्येक काव्यात एक 'सहज' लय असते. साध्या, सहज शब्दातली पण गर्भरेशमी अर्थाची अशी त्यांची कविता आहे. या कवितेतही आपल्याला ही सहजता आपल्याला भावून जाते. 

सांजवेळ झाली की सारीकडे अंधारुन येते. या सावळ्या सांजेलाच कवी कृष्णाच्या सावलीची उपमा देतो. सांजवेळी गावाकडे परतणाऱ्या साऱ्या वाटा या सावळ्या रंगात बुडाल्या आहेत. हा सावळा रंग भयाचा नाही. हा तर कृष्णाच्या कांतीचा आश्वासक रंग आहे. गाई पायदळी धूळ उडवीत परतत आहेत आणि त्यांच्यासवे पाखरांचे थवे सुद्धा आपल्या घरट्यांकडे झेपावताना दिसत आहेत. दूरवर कोठेतरी नदीच्या पैलथडीला असलेल्या मंदिरातून घंटानाद होत आहे. असे सायंकाळचे नयनरम्य वर्णन कवीने कवितेत केले आहे. 

पर्वतांची ही जी दूरवर गडद होत जाणारी रांग दिसतेय ती जणू या अपूर्ण निसर्गचित्राला दृष्ट लागू नये म्हणून विधात्याने रेखलेली काजळाची रेघच! नदीच्या पात्रातील डोहावर आता चांदणे तरळू लागले आहे. आणि या डोहाभोवतालच्या चाहुलींना सुद्धा त्या सावळ्याचाच रंग चढला आहे, असे कवी म्हणतो. 

केवळ तीन कडव्यांच्या या काव्यातील सर्वात अप्रतिम कडवं हे तिसरं आहे. 

माऊली सांज अंधार पान्हा! 

गाण्यातील ही ओळ ऐकण्यासाठी माझ्या मनाची उत्सुकता नेहमी अगदी शिगेला पोहोचलेली असते. सांजेला आईची उपमा? हे असं कोणत्याच कवितेत वाचलं नव्हतं. सांजवेळ म्हणजे मनाला कातरणाऱ्या क्षणांची वेळ किंवा गतकाळातील आठवणी मनात रुंजी घालण्याची वेळ. परंतू ही सांजवेळ म्हणजे माऊली? 

होय. कारण याच सांजवेळी पक्षी आपल्या घरट्यांत परततात. पिल्लांना बिलगतात. दिवसभर हुंदडणारी वासरे गोठ्यात आपल्या आईशी लगट करतात. आपणही नाही का दिवसभर हुंदडून लहानपणी घरी परतत होतो? पुन्हा मायेच्या पदराखाली सरकत होतो? अशी ही लेकरांना आपापल्या आईपाशी नेणारी सांज जणू अंधाराचा पान्हा पाजते. आणि सारी सृष्टी जणू गुपचूपपणे हा पान्हा पिणारा तान्हाच होते! या सगळ्या धर्तीवर वाऱ्यावर वाहणारी मंद बासरी म्हणजे उधळत जाणाऱ्या अमृताची ओंजळ आहे, असे कवी म्हणतो. 

या गीताचं संगीत आपल्याला कवितेतल्या काव्याच्या जवळ नेणारं आहे. संगीतकार श्रीधर फडके यांनी या गीताला संगीत दिलं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे श्रीधर फडके यांनी अगोदर चालीचा मुखडा तयार केला होता, त्या मुखड्यावर सुधीर मोघे यांनी काव्य रचलं. गीताची चाल खास संध्याकाळाची छाया असणारी आहे. त्यामुळेच हे गीत श्रवणीय झाले आहे. गीतातील बासरीची धून आणि संतूर यामुळे एक वेगळेच नादमाधुर्य लाभले आहे. आणि आशा भोसले यांच्या आवाजाने एका वेगळ्याच उंचीवर हे गाणे पोहोचले आहे. 

वजीर या चित्रपटात हे गीत चित्रित करण्यात आलं आहे. अभिनेत्री अश्विनी भावे यांनी पडद्यावर छान साकारले आहे. 

सांज ये गोकुळी, सावळी सावळी 
सावळ्याची जणू साऊली 

धूळ उडवीत गाई निघाल्या
श्याम रंगात वाटा बुडाल्या 
परतती त्यासवे 
पाखरांचे थवे 
पैल घंटा घुमे राऊळी 

पर्वतांची दिसे दूर रांग 
काजळाची जणू दाट रेघ 
होई डोहातले 
चांदणे सावळे 
भोवती सावळ्या चाहुली 

माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी 
वाहते बासरी 
अमृताच्या जणू ओंजळी 

गीत - सुधीर मोघे
स्वर - आशा भोसले
संगीत - सुधीर फडके
चित्रपट - वजीर











Comments

Popular posts from this blog

घरपरतीच्या वाटेवरती