घरपरतीच्या वाटेवरती



          अशा एका संध्याकाळी आपण परतू लागतो घरपरतीच्या वाटेवरती. या परतीच्या वाटेवर गत आठवणींची धूसर धूळ उडत असते. आपली नजर अंधुक होते. वर्तमानाच्या अगतिकतेचा क्षणभर विसर पडल्यासारखा होतो. आणि थकलेली पावलं अडू पाहतात. धुळीच्या लोटामधील भूतकाळातील त्या हव्याहव्याशा क्षणांच्या मृगजळाभोवती पुन्हापुन्हा घुटमळू पाहतात...

          घरपरतीच्या या वाटेवर अनेक पडल्या-झडल्या खुणा आहेत. जीर्णशीर्ण झाल्या असल्या तरी मावळतीची किरणं त्यांवर पडल्यावर त्या खुणा पुन्हा झळझळून आपल्यासमोर येतात. आपणच अशा वेळी दिपून जातो पुन्हापुन्हा त्यांना निरखून. घरपरतीची ती वाट कोकणातल्या एखाद्या नदीच्या एका खोल खोल डोहासारखी होऊ भासते. हळूहळू आपल्याला अंधाऱ्या तळाशी नेणारी. आपल्यातलं सारं त्राण हिरावून नेणारी. या वाटेवरच्या धुळीत अनेक पाऊल ठसे मिसळले आहेत. आपल्या मनाप्रमाणे या पायवाटेने ते अजूनही जपले आहेत. फक्त आपल्यासाठी.

          आता घरपरतीच्या दिशेने आपल्या पावलांच्या सोबतीने पडणारी पावले नाहीत... पण त्या पावलांचे ठसे मात्र ठळकपणे आपली सोबत करताहेत.

          या परतीच्या वाटेवर धूळ उडेल, डोळे भरून येतील. तीच आर्त तान, तेच अस्पष्ट हुंदके पुन्हापुन्हा ऐकू येतील. तेच हसू पुन्हापुन्हा कानांजवळ रुंजी घालू पाहील. आभासांच्या सावल्या आपल्या पायाला जखडू पाहतील. पुन्हापुन्हा आपले ओठ मुकेपणाने तेच हताशपण पुटपुटत राहतील. 

          अनेकदा या अशा कातरवेळी आपण या वाटेने आपल्या उंबऱ्याशी जातो. आपण पुन्हापुन्हा केलेल्या लाख चुकांची कबुली या वाटेपाशी, त्यांवरच्या पाय ठशांपाशी, त्या गहिऱ्या आभासांपाशी, त्या हुंदक्यांपाशी देतो. त्यांना ते ऐकू जातच नाहीत.

          मात्र सांजसमयीची ही मलूल उन्हे आपली खरी सोबत करतात. केलेल्या लाख गुन्हांना साक्षी असूनही ते माझे मुके शब्द ऐकून घेतात. त्यांनी माझी सोबत करायचे ठरवलेच असावे बहुदा. स्नेहभराने मला कुरवाळणारा त्यांचा हात म्हणूनच मला या घरपरतीच्या वाटेवर हवाहवासा वाटतो...



"काळजात रुतून बसेल अशा अनुराधा मराठे यांच्या स्वरातील शांता शेळके यांनी लिहिलेले हे गाणे.. ज्याला इनामदारांनी असं संगीत दिलंय ज्याला तोडच नाही.."


घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा

घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसें
अश्रुत चाहूल येते कानीं.. एक हुंदका, एक हसे

घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके

घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हें
कुरवाळिती मज स्‍नेहभरानें विसरून माझे लाख गुन्हें...
- शांता शेळके.

संगीत - कौशल इनामदार
स्वर - अनुराधा मराठे
अल्बम - शुभ्र कळ्या मूठभर





Comments

Popular posts from this blog

सांज ये गोकुळी